सुनील टाकळकर - संपर्क : ९८१९२१८२५८ सोमवार, १८ जानेवारी २०१० एक चिनी म्हण 'दि बेस्ट टाईम टू प्लँट ए ट्री इज २० इयर्स अॅगो. दि सेकंड बेस्ट टाईम इज नाऊ..' मी मागेच शेअर्स घ्यायला पाहिजे होते किंवा विकायला पाहिजे होते असं म्हणण्यात आणि विचार करण्यात वेळ न दवडता आताच शेअर्स घ्यायला सुरुवात करा! कारण सेन्सेक्स कधी बदलेल आणि तुम्ही तोटय़ात जाल हे साक्षात ब्रह्मदेवालादेखील सांगता येणार नाही. २५ जुलै १९९० रोजी १००० वर असणारा सेन्सेक्स १० हजारांवर पोहोचलाय. १५ वर्षे १५ महिने वाट पाहावी लागली तर १०,००० वरून २०,००० वर पोहोचायला केवळ दहा महिने लागले. यानंतर २०,००० वरून ८५०० पर्यंत घसरगुंडीला आठ महिने २७ दिवसच पुरले आणि त्यानंतर परत १७००० पर्यंत पोहोचायला जवळजवळ सात/आठ महिने वाट पाहावी लागली. तरीपण जानेवारी २००८ मध्ये २१००० च्या उच्चांकावर गेलेला सेन्सेक्स गेले दोन वर्षे १७-१८ हजाराच्या पातळीवर रेंगाळतोय! अशा या वातावरणात नक्की काय करायचे, धोरण कसे आखायचे, कुठले आडाखे/अंदाज बांधायचे यासंबंधी हे छोटेखानी मार्गदर्शन! १) बाजाराचा आढावा घ्या आणि गुंतवणुकीत योग्य ते बदल करा : २००९ साल गाजलं ते राजू प्रकरणाने आणि त्याने केलेल्या सत्यम घोटाळ्याने. टेक महिंद्रने जरी सर्वस्वी जबाबदारी घेतली असली तरी ७०० रुपयांपर्यंत गेलेला शेअर आणि त्यानंतर आठ/नऊ रु.ना मिळणारा शेअर अजूनही १००-१४० रु.च्या दरम्यान रेंगाळतोय! त्यामुळे 'सत्यम'ची खरी किंमत किती, जुन्या शेअरहोल्डर्सच्या तोटय़ाचे काय? केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही सत्यम विरुद्ध केसेस चालू आहेत त्याचा आढावा घ्यावा. सत्यम हे एक उदाहरण झालं. त्याचप्रमाणे रिलायन्समधील अंबानी बंधूंतील वाद, नव्या वर्षांत २०१० पासून बजाज स्कूटर्सचे बंद होणारे उत्पादन, पब्लिक सेक्टरमध्ये निर्गुतवणुकीचे सरकारी धोरण अशा कितीतरी घटना/प्रकरणे तुमच्या पोर्टफोलिओवर दबाव आणू शकतात. त्यासंबंधी वेळोवेळीच्या बातम्या, टीका आणि धोरणे यांचा अभ्यास करा अन् मगच शेअर्स घ्या/विका. २) अर्थव्यवस्थेतील बदल, जागतिक घडामोडी बाजार हलवू शकतात : अमेरिकन 'सबप्राईम' प्रकरण असो वा 'दुबई डिबॅकल' असो, भारतीय शेअरबाजारावर ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम करू शकतात. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत २०१० साली काय काय घडण्याची, घडवण्याची आणि बदलाची शक्यता आहे त्याच्या आकडेवारीवर जरा नजर टाकून बघा. आयएमएफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर २००७ साली ५.१%, तर २००८ साली ३.१% तर २००९ साली नकारात्मक- १.४% होता तो आता सुधारून २.५ टक्के होण्याची शक्यता आहे. थोडक्यात मंदीतून सावरण्याची शक्यता आहे. ३) भारतात गुंतवणुकीला संधी : भारतीय शेअरबाजारासाठी २००७ साली ९.४% जीडीपी २००९ मध्ये ५.४% पर्यंत खाली आला असला तरी आय. एम. एफ.च्या अंदाजानुसार ६.५% जीडीपी होण्याची शक्यता आहे. आपले मा. अर्थमंत्रीही आठ टक्के जीडीपीची स्वप्ने बघत आहेत. बोमुरा रिसर्च, आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून ०९ पासून उत्पादनवाढीची केवळ शक्यताच नाही तर २० टक्क्यांपेक्षा खाली गेलेले उत्पादन ५९.८% पर्यंत वर आलेले आहे ते जवळजवळ ७० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ५०,२८९ करोडपर्यंत खाली गेलेली निर्यात जून २००९ पासून ६१,२१७ कोटींनी वाढलेली आहे. हाच ट्रेंड २०१० मध्ये दिसणार आहे. ४) सेन्सेक्स कसा राहील? सेन्सेक्समधले उतार-चढाव लक्षात घेता सेन्सेक्स उच्चांकाचे दिवस जास्त राहतील. तर अधूनमधून नीचांक राहणार आहे. त्यामुळे सेन्सेक्स एकदम २५,००० किंवा ५०,००० पर्यंत जाईल अशी दिवास्वप्ने बघू नका. त्याची आकडेवारी पाहून ट्रेंड लक्षात घ्या. डिसें. २००६- १३,६२८, डिसेंबर २००७- १९,८२७, जानेवारी २००८- २१,२०६ तर मार्च २००९- ८९९५, डिसेंबर २००९- १७,७५२ तर जून २०१० मध्ये सेन्सेक्स २२,४१२ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान काही जागतिक घडामोडी झाल्या तर जून २०१० च्या आसपास सेन्सेक्स ९७१८ पर्यंतही खाली घसरण्याची शक्यता आहे. ५) कंपन्यांच्या नफ्यातही वाढीची शक्यताच नाही तर वाढ दिसू लागलेली आहे : डिसेंबर २००८ मध्ये सर्वसाधारण पातळीच्या खाली गेलेला 'ऑपरेटिंग प्रॉफीट'- मार्च २००८-०९ मध्ये ३६.२ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर गेला आहे तर जून २०१० मध्ये तो ५४.७ टक्क्यांवर जण्याची शक्यता आहे. या सगळ्या वातावरणात नेमके काय कराल? शेअरबाजार 'गांभीर्याने' घ्या- 'टेक इट सिरीयसली' : बरेचसे गुंतवणूकदार, दररोज केवळ टीव्ही स्क्रीनवर वा ब्रोकर्सच्या ऑफिसमध्ये बघण्यात आणि चर्चा करण्यात वेळ घालवतात. काही तर डे ट्रेडिंग ठिय्या देऊन, (नोकरीच्या ठिकाणी न जाता) ब्रोकर्सच्या ऑफिसमध्ये वा ऑनलाईन ट्रेडिंगकरता तासन् तास वेळ घालवतात. नशीब चांगलं असेल तर २००/४०० रु. सुटतातही पण वेळ किती घालवणार? हे सगळं करण्यापेक्षा शेअरबाजारातल्या विविध कंपन्यांचा अभ्यास करा, वाचा अन् स्वत:ला अपडेट करा! केवळ 'टिप्स'वर अवलंबून राहू नका. कंपन्यांच्या कामगिरींवर लक्ष ठेवा : इन्फोसिसने डिव्हिडंड व बोनस शेअर्स जाहीर केले की परदेशात फटाके का वाजतात? अन् आनंदोत्सव होतो? येणारे बजेट कुठल्या क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी तारक वा मारक आहे. सरकारचे पीएसयूच्या बाबतीत घेत असलेल्या वा घेणार येत असलेल्या धोरणांचा काय परिणाम होणार आहे? बजाजने स्कूटर उत्पादन बंद केल्यावर टू व्हीलर कंपनीना काय फायदा होणार आहे? तसेच या घटनेच्या त्या त्या कंपन्यांतल्या शेअर्सवर काय परिणाम (उतार-चढाव) होणार आहेत? हे लक्षात घ्या. पीएसयू कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीबाबत पुढाकार घ्या: ४८ पीएसयूची डिसेंबर २००० मध्ये मार्केट मालमता ८७,७७९ कोटी रु. होती तर ऑक्टोबर २००९ साली ९,१२,८५४ साली भेल, इंडियन ऑईल, एनटीपीसी, एसबीआय, भारत-इलेक्ट्रॉनिक्स, कन्टेनर कॉर्पोरेशन, रुरल इलेक्ट्रिफिकेशन, गेल, एमएमटीसी, पॉवर ग्रीड यासारख्या १८ टॉपच्या कंपन्यांचे उत्पन्न भारताच्या जीडीपीच्या १५ टक्के इतके आहे. आर्थिक क्षेत्रातल्या पीएसयू बँकांचा अर्थक्षेत्रातील वाटा ७३% आहे. एकटय़ा एलआयसीचा इंडस्ट्रीजच्या एयूएममध्ये (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) ८८% वाटा आहे. याचप्रमाणे भेलकडे असलेल्या पुढील चार/पाच वर्षांकरिता असलेल्या ऑर्डर्स, स्टेट बँकेच्या शाखांचे देशभर वाढत जाणारे जाळे, एनर्जी, पॉवर सेक्टर, कोल, इंजिनीयरिंग आणि मेटल क्षेत्रातील मक्तेदारी, नफा आणि मार्केट शेअर लक्षात घेता, २०१० मध्ये या कंपन्यांच्या शेअर्समध्येच नाहीतर नफ्यातही वाढ होणार आहे. पोर्टफोलियोचा आढावा घेऊन त्यात बदल करा: १९९० साली धीरुभाईंच्या रिलायन्सच्या शेअर्सने मुलाचे उच्चशिक्षण वा मुलीचे लग्न झाले असले तरी दीर्घकाळ गुंतवणुकीच्या आणि त्याबद्दलच्या भूतकाळातील आठवणींमध्ये अडकू नका! तेजी वा मंदी असो टप्प्याटप्प्याने शेअर्सची खरेदी-विक्री करा अन् 'प्रॉफिट' बुक करा. पोर्टफोलिओमध्ये केवळ रिलायन्स, टाटा, स्टेट बँक एवढय़ाच कंपन्याचे शेअर्स न ठेवता किमान विविध क्षेत्रांतील १५-२० कंपन्यांचे शेअर्स असणे आवश्यक आहे. त्यातही आपण घेतलेल्या एखाद्या कंपनीचा शेअर्स वाढत नसला तरी फारसे दु:ख न बाळगता विकून टाका आणि दुसऱ्या चांगल्या कंपनीचे शेअर्स घ्या. म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करा: आपल्याला एखादा खेळ खेळायला जमत नसेल तर जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा आधार घ्या. म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना पाच गोष्टी लक्षात ठेवा. १) फंडाचे उद्देश २) फंडाचा खर्च ३) फंड मॅनेजर्ससंबंधी माहिती ४) फंडची प्रगती ५) जोखीम (रिस्क). एकदम गुंतवणूक न करता 'एसआयपी'चा उपयोग करा. बिर्ला इक्विटी फ्रंटलाईन फंड, एचडीएफसी टॉप २००, बिर्ला सनलाईफ टॅक्स रिलीफ ९६, सुंदरम बीएनपी परिबा सिलेक्ट फोकस, कोटक ३०, रिलायन्स व्हिजन, रिलायन्स ग्रोथ, एसबीआय मॅग्नम मल्टीप्लायर प्लस ९३, इत्यादी फंडांत पैसे गुंतवणूक करा. गुंतवणूकगुरूंचा उपदेश पाळायला शिका : वारंवार सांगितली जाणारी तत्त्वे, टिप्स आणि सूचना. सौजन्य : वॉरन बफे, गौतम बुद्ध, पीटर लिंच जॉन टेम्पलटन, जॉर्ज सोरोस, बेंजामिन ग्रॅहम. १) गुंतवणूकदार हा गुंतवणूकदार असावा, सट्टेबाज नको. २) शेअरबाजारात 'टाईमिंग' आणि 'प्रॉईसिंग'ची सांगड घातली पाहिजे. ३) डू नॉट फॉलो द क्राऊड. इतर करतात म्हणून तुम्ही करू नका. ४) कमीतकमी भावात शेअर्स खरेदी करता येत नाही, त्यामुळे एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये सर्व रक्कम गुंतवू नका. एकाच वेळी साधारणत: ३० वेगवेगळ्या कंपन्यांतील शेअर्समध्ये गुंतवणूक करा. ५) ज्या कंपनीचा बिझीनेस तुम्हाला समजत नाही अशा कंपनीत पैसे गुंतवू नका. ६) ब्रोकर्सचे मत ऐकू नका, तुमचे निर्णय तुम्हीच घ्या. ७) हाव टाळा. ८) गुंतागुंत नको, सरळ साधी सोपी गुंतवणूक करा. ९) शेअर्स नाही बिझिनेस विकत घ्या. १०) इतर जेव्हा हव्यास धरतात तेव्हा तुम्ही भ्या, इतर जेव्हा भितात तेव्हा तुम्ही हव्यास धरा. ११) गुंतवणूक क्षेत्रात सकारात्मक दृष्टी ठेवून गुंतवणूक करा. १२) स्वत: अभ्यास करा, लागल्यास विश्वासू अभ्यासू व्यक्तींचे सहाय्य घ्या. १३) ज्या कंपन्यांचे शेअर्स तुमच्याकडे आहेत त्यावर बारीक लक्ष ठेवा. एकदा केलेली गुंतवणूक कधीही कायम नसते. १४) कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊन घाईघाईने निर्णय घेऊ नका. सर्वात शेवटी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे पैशाचे यश हे चांगल्या सवयींचे फळ आहे! त्यामुळे चांगले गुंतवणूकदार व्हा!!
|
No comments:
Post a Comment